Omraje Nimbalkar: ओमराजेंचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेणार, केवळ घोषणा बाकी; भेटीसाठी तानाजी सावंत दाखल

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. धाराशिव येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मतदारसंघातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अपयश आणि वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह मला कायम मिळाला आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीही कटुता नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. मातोश्रीबद्दल आमच्या कार्यकर्त्यांकडून एकही अपशब्द जाऊ नये, अशी सूचना मी सर्वांना दिली आहे.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका
ठाकरे कुटुंबीयांचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळाले आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, मात्र सत्तेअभावी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, धाराशिवमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पराभव झाला.

सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही सत्तेअभावी विकासकामे रखडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वडिलांच्या हत्येच्या प्रकरणातील न्यायालयीन निकालावरही त्यांनी भाष्य केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा