
धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी):शहरातील शास्त्री चौक ते सेफला हायस्कूल या महत्त्वाच्या मार्गावर बंद असलेली बस वाहतूक पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज १ जुलै रोजी शालेय विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या तीव्र ‘चक्काजाम’ आंदोलनाला मोठे यश आले आहे. प्रशासनाच्या अजब कारभारावर सातत्याने प्रकाशझोत टाकल्यानंतर आणि आजच्या धडक आंदोलनानंतर अखेर नगरपालिकेला नमते घ्यावे लागले. मुख्याधिकाऱ्यांच्या सहीनिशी आगार व्यवस्थापकांना पत्र दिल्यानंतर सायंकाळपासून बस वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, हजारो विद्यार्थ्यांचा मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपासून संबंधित मार्गावरील बस वाहतूक बंद असल्याने शिक्षणासाठी दररोज ग्रामीण भागातून धामणगाव शहरात येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत होते. आजपासुन शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत झाल्याने आज तीव्र जनआंदोलन उभे राहिले.

दोन तास ठिय्या, वाहतूक पूर्णपणे ठप्प
आज सकाळी हिराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसह काँग्रेसचे पंकज वानखडे, आशिष शिंदे, मयुर डुबे आणि मोठ्या संख्येने नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. मागण्या मान्य होईपर्यंत हलणार नाही, असा पवित्रा घेत सर्वांनी भररस्त्यात ‘चक्काजाम’ आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला.
आंदोलनाची तीव्रता आणि विद्यार्थ्यांचे हाल पाहून प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला. आणि अखेर प्रशासनाला झुकवावे लागले आंदोलनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत, बस वाहतूक तात्काळ पूर्ववत करण्याबाबत आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र दिले. या पत्रानुसार, बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, बस वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बस वाहतूक बंद असल्याने आम्हाला दररोज शाळेत येताना तासनतास वाट पाहावी लागत होती. आमच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत होता. आजच्या आंदोलनामुळे आणि सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमचा प्रश्न सुटला आहे. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे,” अशी भावना आंदोलक विद्यार्थिनींनी व्यक्त केली.







