
अमरावती/नागपूर – नागपूर येथील इमामवाडा बस स्थानकावरील चार्जिंग स्टेशनमधून चोरीला गेलेली इलेक्ट्रिक एसटी बस अवघ्या एका दिवसात अमरावती शोधून काढण्यात राजापेठ पोलिसांना यश आलं. या कारवाईत तेलंगाणातील एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
नंदा मार्केट परिसरात आढळली बस – राजापेठ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल नाईक पोलीस कॉन्स्टेबल सारंग आदमने आणि नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजय धूर्वे यांना नंदा मार्केट परिसरात संशयास्पद एक इलेक्ट्रिक बस उभी असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी बस चोरणारा संशयित गदरी चौक परिसरात असल्याची खबर मिळताच डीबी पथकानं तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.
आरोपीची ओळख पटली – चौकशीदरम्यान आरोपीने आपलं नाव विष्णू गणपती निलावर ( वय 23) असं सांगितलं. तो तेलंगाणातील रंगारेड्डी जिल्ह्यात येणाऱ्या हरित नगर येथील रहिवासी आहे. त्याने एक जुलै रोजी पहाटे नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकावरील चार्जिंग स्टेशनवरून एमएच 49 बी झेड 82 58 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस चोरी केल्याची कबुली दिली.
एकूण 20 बस चोरल्या – पोलीस तपासात आरोपीने यापूर्वी तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील नांदेडसह विविध ठिकाणांहून तब्बल 20 बस चोरल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध वजीराबाद, तिरूमला, सीसीएससह विविध पोलीस ठाण्यात बस चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
टायर, बॅटरी आणि डिस्कवर डोळा – “तपासादरम्यान आरोपीची चोरीची पद्धत उघड झाली. तो बस चोरून निर्जंन ठिकाणी नेत असे. त्यानंतर बसमधील टायर, बॅटरी आणि डिस्क यासारखे महागडे पार्ट काढून त्याची विक्री करायचा. उर्वरित बस तशीच सोडून तो प्रसार होत असल्याचं तपासात निष्पन्न झालं,” अशी माहिती राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली.
आरोपीवर गुन्हा दाखल – चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक बसची अंदाजे किंमत एक कोटी 53 लाख रुपये असून, याप्रकरणी नागपूरच्या गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली







