लेक चालली सासरला! ४३२ वर्षांची परंपरा जपत कौंडण्यपूरची रुक्मिणी मातेची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना

कौंडण्यपूर (अमरावती): आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक कौंडण्यपूर येथून माता रुक्मिणीची मानाची पालखी आज अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. कौंडण्यपूर ते पंढरपूर अशा ४० दिवसांच्या प्रदीर्घ पायदळ वारीला आजपासून सुरुवात झाली असून, यावर्षी या दिंडीचे ४३२ वे वर्ष आहे.

पंढरपूरच्या वारीमध्ये कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेच्या पालखीला ‘माहेरची मानाची प्रथम पायदळ पालखी’ म्हणून सर्वोच्च मान दिला जातो. माहेरवरून लेक आपल्या सासरी म्हणजेच विठुरायाच्या चरणी जात असल्याचा हा भावनिक आणि नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

४०० वर्षांची अखंड परंपरा

इ.स. १५९४ मध्ये, म्हणजेच आजपासून सुमारे ४०० वर्षांपूर्वी संत सद्गुरू सदाराम महाराज यांनी कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी ही पायदळ वारी सुरू केली होती. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही भक्तीची परंपरा आजही वारकरी तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे चालवत आहेत.

ओटी भरून पालखी मार्गस्थ; फुगड्यांचा गजर

प्रस्थान सोहळ्याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माता रुक्मिणीची साडी-चोळी देऊन आणि ओटी भरून शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरातून पालखीचे मुख्य प्रस्थान झाले. पालखी गावात येताच ठिकठिकाणी गावकऱ्यांनी रांगोळ्या काढून, आरती ओवाळून पालखीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी महिला भजन मंडळींनी टाळ-मृदंगाच्या साथीने आणि फुगडीच्या तालावर विठ्ठल-नामाने अवघा परिसर भक्तीमय करून सोडला.

पाच पाऊली स्थळावर फटाक्यांची आतिषबाजी

कौंडण्यपूर येथील ‘पाच पाऊली स्थळावर’ पालखी पोहोचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती, रविराज देशमुख मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले.

शेवटी, मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व वारकरी आणि भाविक भक्तांचे डोळे आनंदाश्रूंनी आणि भक्तीभावाने दाटून आले होते. माहेरवरून लेक सासरी जातानाचा हा अत्यंत हृदयस्पर्शी निरोप सोहळा अनुभवून वारकरी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या गजरात पंढरीच्या वाटेवर चालू लागले आहेत.

आणखी वाचा