
अमरावती (प्रतिनिधी):
विदर्भ सिंचन अनुशेष निर्मूलन महर्षी, शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक आणि माजी आमदार प्रा. बी. टी. उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे विदर्भाच्या हक्कासाठी आणि विकासासाठी लढणारा एक बुलंद व नैतिक आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शनिवार, २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगी, भाऊ नाना देशमुख यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.
६ वेळा भूषविले पदवीधरचे प्रतिनिधित्व
प्रा. बी. टी. देशमुख हे अमरावती पदवीधर मतदार संघाचे सलग ६ वेळा (३६ वर्षे) आमदार राहिले होते. ‘नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन’चे (नुटा) ते संस्थापक अध्यक्ष होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी शासनाला अनेक शैक्षणिक सुधारणा करण्यास भाग पाडले आणि शिक्षकांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले.
विदर्भाचा अनुशेष आणि सिंचनासाठी लढा
विदर्भाचा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत झालेला सर्वच क्षेत्रातील अन्याय आणि विकासाचा अनुशेष त्यांनी विधिमंडळात अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मांडला. तत्कालीन विधिमंडळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या मुद्द्यांना नेहमी बळ दिले, ज्यामुळे तत्कालीन शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. अमरावती शहराची तृष्णा भागवणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत आणि पेढी धरणाच्या मंजुरीसाठी त्यांनी मोठा आग्रह धरला होता. तसेच, नांदगाव पेठ येथील कोळशावर आधारित ‘रतन इंडिया’ औष्णिक विद्युत प्रकल्पाला त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावरून शेवटपर्यंत कडाडून विरोध केला होता.
नैतिकतेचे राजकारण आणि जिव्हाळ्याचे संबंध
प्रा. बी. टी. देशमुख यांनी आयुष्यभर नैतिकतेची पाठराखण करत राजकारण केले, त्यामुळेच ते अनेकांच्या आदर्शस्थानी होते. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना हृदयाचा त्रास होता, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांना तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमरावतीमधील त्यांच्या निवासस्थानी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी अंत्यदर्शन घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.








