विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व संगीत दिवस उत्साहात साजरा

धामणगाव रेल्वे

धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संगीत शिक्षक सागर ठाकरे यांनी योग आणि संगीत यांचे महत्त्व प्रभावी शब्दांत स्पष्ट केले. संगीत आणि योग या दोन्हीच्या समन्वयाने मन प्रसन्न राहते, ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते, तर योगामुळे शरीर निरोगी राहून लवचिकता आणि मानसिक शांतता प्राप्त होते. योग व संगीत यांचा नियमित सराव केल्यास जीवन अधिक संतुलित, आनंदी व यशस्वी बनते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले व योग साधनेचा संदेश देणारे गीत सादर केले. तसेच वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल मधुकर निखार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमात क्रीडा शिक्षक वैभव देशमुख यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संचालक राजेंद्र जोशी, प्राचार्य बेन्नी सॅम्युअल, उपप्राचार्या साई नीरजा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी योग व संगीत यांचे महत्त्व ओळखून ते आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.

आणखी वाचा