
अमरावती, दि. २१ (जिमाका):
उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय, नवी दिल्ली आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज २१ जून रोजी विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोअर हॉलमध्ये १२ वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन ‘ साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून श्रीमती गुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थित सर्वांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी राजू वडते, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे या मान्यवरांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यंदाच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग ‘ आणि घोषवाक्य ‘योग करा निरोगी रहा आणि आनंदी आयुष्य जगा ‘ असे आहे. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पोलीस विभाग, जिल्हा होमगार्ड, स्काऊट गाईड, पतंजली योग समिती, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग, लोकमत सखी मंच, विविध योग व क्रीडा संघटना, तसेच विविध शाळा-महाविद्यालयांचे सुमारे ३ हजार युवक, युवती, विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी सकाळी ७ ते ८ या कालावधीत उत्साहाने सहभाग घेतला.
आर्ट ऑफ लिविंगचे वरिष्ठ योग शिक्षक व समन्वयक नीरज अग्रवाल यांच्या आनंददायी मार्गदर्शनात तज्ज्ञांनी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महसूल, पोलीस, होमगार्ड, स्काऊट गाईड, एन.सी.सी. आणि जिल्हा माहिती कार्यालय व प्रसारमाध्यमांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी केले.








