
अमरावती, दि. २१ (जिमाका): आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा विभागीय क्रीडा संकुल समितीच्या उपाध्यक्षा नयना गुंडे यांनी येथील विभागीय क्रीडा संकुलाला भेट देऊन विविध क्रीडा सुविधांची पाहणी केली.
क्रीडा संकुलाची पाहणी करताना विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी टेबल टेनिस आणि स्क्वॅशच्या मैदानावर उतरून खेळाडूंसोबत खेळाचा आनंद घेतला. खेळाडू आणि प्रशिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील राष्ट्रीय स्तरावरील हॅण्डबॉल आणि टेबल टेनिसच्या आठवणींना उजाळा देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.
क्रीडा संकुलाच्या अधिक विकासासाठी खेळाडूंना आधुनिक उपकरणे, उत्कृष्ट क्रीडा साहित्य आणि आवश्यक अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे काम अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित कंत्राटदाराला योग्य निर्देश देऊन कामाला गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
क्रीडा संकुलातील आर्चरी, स्केटिंग रिंग, कुस्ती, बुद्धिबळ, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक हेल्थ सेंटर अशा सर्वच क्रीडा सुविधांची त्यांनी प्रशंसा केली. शहरातील खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक या शासकीय क्रीडा सुविधांचा लाभ घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.








