पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढता हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे मानले जाते

मुंबई : १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र नऊपैकी केवळ चारच खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले. पक्षात पुन्हा मोठी फूट पडत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. १६ जून रोजी सहा खासदार दिल्लीला पोहोचले आणि १७ जून रोजी त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्याच दिवशी अशी माहिती समोर आली की, संजय दिना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार १८ जून रोजी होणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाच्या बैठकीला परतण्याची शक्यता आहे; मात्र सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘झूम’ कॉन्फरन्स कॉलद्वारे सर्व खासदारांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचे मान्य केले.
एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ कॉलच निर्णायक ठरला. शिंदेंनी या सहा खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारीचे आश्वासन तर दिलेच, पण त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेची हमीही दिली. हे सर्व खासदार आज, २० जून रोजी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ का सोडली, याचे स्पष्टीकरण देणारे निवेदनही जारी करणार आहेत. तसेच शिंदेंचे पुढील लक्ष्य ठाकरे गटातील तीन विधान परिषद आमदार आणि मुंबई महापालिकेतील सर्व ६५ नगरसेवक असल्याचेही सूत्रांकडून समजते.
खासदारांमधील नाराजीचे कारण काय?
१. पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे म्हटले आहे. बंडखोर खासदारांच्या मते, इतर नेत्यांशी संजय राऊत यांचे वागणे अयोग्य असते; तरीही त्यांच्याविरुद्धची कोणतीही टीका किंवा तक्रार ऐकून घेण्यास उद्धव ठाकरे तयार नसतात.
२. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्याची आणि मतदारसंघांना भेटी देण्याची विनंती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करुनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
दिल्लीत दाखल झालेले ठाकरे गटाचे सहा बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात होते. शिंदेंनी त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. ‘तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या पाठीशी उभा राहीन’ अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती आहे.
बंडखोर खासदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची हमी आणि त्यांच्या मतदारसंघांतील विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. शिंदे यांच्याशी झालेल्या वैयक्तिक चर्चेनंतर, ठाकरे गट सोडण्याचा या खासदारांचा निर्धार अधिकच दृढ झाला.
संजय राऊत पक्षातील सर्वात ताकदवान नेते आहेत, म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात काही ऐकून घेत नाहीत. संजय राऊत कोणालाही काहीही बोलतात, असंही बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे. ‘प्रत्येक निर्णयात रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो. उद्धव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. रश्मी ठाकरे जरी ‘सामना’च्या संपादक असल्या आणि त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसले, तरी पक्षात त्यांचा दबदबा तितकाच मोठा आहे.’ असं खासदारांनी म्हटल्याची माहिती हाती आली आहे








