विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

धामणगाव रेल्वे

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेचे संचालक राजेंद्र जोशी प्राचार्य बेनी सॅम्युअल, उपप्राचार्या साई नीरजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर पुष्पवर्षाव, टिळा लावून तसेच हसतमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने नटला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबद्दल विशेष उत्साह दिसून आला. संचालक राजेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तर प्राचार्य बेनी सॅम्युअल यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, उत्तम संस्कार आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देत नव्या वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ शिक्षकांकडून ये नन्हे फूल एक दिन नया भारत बनायेंगे, इरादा कर लिया है हम इन्हे ऐसा पढ़ायेंगे! या सुमधुर गीताने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेला ‘विद्यानिकेतन’ या नावाचे २० फुटाचे भव्य व आकर्षक कलात्मक चित्र विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून आपल्या हस्तठशांचे रंगीत ठसे उमटवत विद्यानिकेतन नाव तयार केले. नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्नांच्या उत्साहाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रेमळ स्वागत केले व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. या अनोख्या स्वागत उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांना शाळेशी भावनिकरित्या जोडणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश चौधरी यांनी केले.

आणखी वाचा