Vaibhav Suryavanshi : 11 चेंडूत अर्धशतक…जग थक्क! 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेटला आणखी एक सुपरस्टार मिळाल्याची चाहूल देणारी खेळी रविवारी पाहायला मिळाली. अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने श्रीलंका अ संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेच्या अंतिम सामन्यात असा धडाका उडवला की क्रिकेट विश्व अचंबित झाले. फक्त 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत त्याने लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.

वैभव सूर्यवंशीचा तुफानी हल्ला
रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय वैभव सूर्यवंशीच्या वादळी फलंदाजीसमोर पूर्णपणे फसला.सलामीला आलेल्या वैभवने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळीची सुरुवात केली. मोहम्मद शिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत त्याने आपल्या इराद्यांचे संकेत दिले. त्यानंतर शिराजच्या पुढील षटकात त्याने अक्षरशः धुमाकूळ घालत 3 षटकार आणि 2 चौकारांसह तब्बल 26 धावा वसूल केल्या.

अखेरीस लाँग-ऑनच्या दिशेने भेदक षटकार ठोकत वैभवने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि क्रिकेट इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले.

20 वर्षे जुना जागतिक विक्रम मोडला
या खेळीसह वैभव सूर्यवंशीने श्रीलंकेच्या कौशल्या वीराटनेचा तब्बल 20 वर्षे जुना विक्रम मोडून काढला. वीराटनेने 2005 मध्ये रागामा क्रिकेट क्लबसाठी खेळताना 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
आता 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा वैभव लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.
यासोबतच त्याने भारताचा विक्रमही आपल्या नावावर केला. यापूर्वी सरफराज खानने 2025-26 विजय हजारे चषकात पंजाबविरुद्ध 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते

खराब फॉर्मनंतर थेट विश्वविक्रम
विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीचा फॉर्म चिंतेचा विषय बनला होता. चालू मालिकेत त्याला अपेक्षित धावा करता आल्या नव्हत्या. याच आठवड्यात मैदानावरील एका वादामुळेही तो चर्चेत आला होता.

मात्र, सर्व टीका आणि दबाव झुगारून देत या युवा फलंदाजाने आपल्या बॅटमधून थेट विश्वविक्रम साकारला. केवळ 12 लिस्ट ए सामन्यांचा अनुभव असलेल्या वैभवने दाखवून दिले की तो भारतीय क्रिकेटचा पुढील मोठा चेहरा ठरू शकतो.

बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वैभवच्या नावावर यापूर्वी लिस्ट ए क्रिकेटमध्ये 190 धावांची सर्वोत्तम खेळीही नोंदवली गेली आहे. आता 11 चेंडूंतील अर्धशतकाच्या विश्वविक्रमामुळे त्याचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये अधिक ठळकपणे झळकू लागले आहे

आणखी वाचा